रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-रशिया संबंध आणि तेल आयात करण्याच्या मुद्यावरून रशियासह भारताला घेरले आणि भारतावर २५ टक्के आयात कर लावतानाच रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याने दंड लावण्याचा इशारा दिला होता. असे असले तरी भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून आपली रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच राहील, असे म्हटले आहे. भारत सरकारने देशातील रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून तेल खरेदी न करण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. सध्या भारत अमेरिकेच्या धमकी आणि आपल्या गरजांनुसार निर्णय घेण्याबाबत विचार करत आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणा-या भारतीय वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ वाढविला आहे. यासोबतच रशियासोबत भारताचा व्यापार सुरू असल्याने विशेषत: तेल खरेदी सुरू असल्याने दंडही आकारण्याची धमकी दिली आहे. त्यातच पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी मीडियासोबत बोलताना भारत जर रशियाकडून तेल खरेदी करणार नसेल तर चांगले पाऊल असल्याचे म्हटले होते. या माध्यमातून ट्रम्प यांनी भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ट्रम्प यांच्या दंडाच्या धमकीनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. रिपोर्टनुसार रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारी आणि खासगी तेल कंपन्यांना त्यांच्या पसंतीच्या विक्रेत्याकडून तेल खरेदी करण्याची परवानगी असेल, हा त्यांचा व्यापारी निर्णय असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि रशियाकडून शस्त्र आणि तेल खरेदी करत असल्याने दंड लादला होता. रशियासोबत भारताने मैत्री कायम ठेवल्याने हा दंड आकारण्यात आला होता. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात रिफायनरी कंपन्यांना रशियाच्या पर्यायांबाबत प्लॅन तयार ठेवण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.
पुन्हा आखाती देशावर
अवलंबित्व वाढणार
रशियाचा पर्याय म्हणून कोण कोणते देश तेल खरेदीसाठी पर्याय ठरू शकतात, यावरही विचार करण्यात आला. भारताने रशियाकडून तेल खरेदी खरेदी कमी केल्यास पुन्हा एकदा आखाती देशांवरील अवलंबित्व वाढेल. त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, असा मुद्दा पुढे आला.
टॅरिफमध्ये आता
बदल होणार नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट २०२५ पूर्वीच कॅनडा, ब्राझील, भारत, तैवान, स्वित्झरलँडवर नवे टॅरिफ लादण्याची घोषणा केली. अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी रविवारी स्पष्ट केले की, ज्या देशांवर टॅरिफ लादले आहे, त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. जरी काही देशांसोबत व्यापारी करारावर चर्चा सुरु असल्या तरी जे टॅरिफ फिक्स केले असेल ते कायम राहील, असे ते म्हणाले.

