नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने पीसीबी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईच्या हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर पाकिस्तानला जाण्यापूर्वी नक्वी यांनी ती ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात ठेवली. ते अजूनही भारताला ट्रॉफी सोपविण्यास तयार नाहीत. त्यामुळे बीसीसीआय आता आयसीसीकडे तक्रार करणार आहे.
बीसीसीआयने एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना एक अधिकृत ई-मेल पाठवून विजेत्या संघाला ट्रॉफी लवकरात लवकर सोपवावी, असे म्हटले. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही माहिती दिली. आम्ही एसीसीला पत्र लिहिले असून, ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जावी, असे म्हटले. याबाबत त्यांनी प्रतिसाद दिला नाही किंवा नकारात्मक उत्तर आल्यास आयसीसीला पत्र लिहिणार असल्याचे म्हटले. आम्ही एक एक पाऊल पुढे जातोय, असेही त्यांनी सांगितले. जर मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यास तयार झाले नाहीत तर बीसीसीआय कठोर कारवाई करेल. जर आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळाली नाही तर बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार असल्याचेही देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले. आता बीसीसीआय हा मुद्दा आयसीसीच्या बैठकीत मांडणार आहे. आशिया चषकाच्या ट्रॉफीच्या प्रकरणात भारताला श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा पाठिंबा मिळाला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला ५ विकेटने पराभूत केले होते. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावर भारताने एमिरेटस क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांनी ट्रॉफी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोहसीन नक्वी यांनी भारताची ही अट मान्य करण्यास नकार दिला. मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू जवळपास एक तास मैदानावर वाट पाहत राहिले. मात्र, तिढा सुटला नाही. मोहसीन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन निघून गेले. त्यावेळी भारतीय संघाने प्रतिकात्मक जल्लोष केला. आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले होते.
गेल्या आठवड्यात एसीसीला दिले पत्र
आशियाई क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसआयचे सचिव, बीसीसीआयचे एसीसी प्रतिनिधी राजीव शुक्ला आणि श्रीलंका क्रिकेट आणि अफगाणिस्तानसह इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषदेला भारताला ट्रॉफी द्यावी, असे पत्र दिले होते. मात्र, मोहसीन नक्वी यांचा भारताबाबत हेकेखोरपणा कायम आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
नक्वीचा नवा प्रस्ताव
आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या एका सूत्राच्या माहितीनुसार मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयच्या कोणत्याही प्रतिनिधीने दुबईच्या एसीसीच्या मुख्यालयात येऊन ट्रॉफी घेऊन जावे, असे म्हटले. मात्र, बीसीसीआयने तो प्रस्ताव नाकारला. बीसीसीआय हा मुद्दा आयसीसीकडे नेणार असून, लवकरच यासंबंधी तक्रार केली जाणार आहे.
















