वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कमालीची कटुता आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. यासंदर्भात भारताकडे २१ दिवसांची मुदत आहे. यातच अमेरिकेतील एका अर्थशास्त्रज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली असून, भारताला एक महाशक्ती संबोधले आहे.
अमेरिकन राजकारणात भारताच्या हिताला प्राधान्य नाही. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले ५० टक्के टॅरिफ हे केवळ चुकीचे, अन्यायकारक असून, असंवैधानिक आहेत. यातून हेच स्पष्ट संकेत जात आहेत की, वॉशिंग्टनशी संबंध कायमस्वरूपी विश्वासाच्या पायावर आधारित नाहीत, या शब्दांत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर तोंडसुख घेतले.
अमेरिका स्वत:ला मित्र म्हणवून लोकांना फसवत आहे. भारताने या सापळ्यात अडकू नये. काही महिन्यांपूर्वीच्या भारत भेटीदरम्यान भारताला अमेरिकेसोबतच्या कोणत्याही व्यापक व्यापार संबंधांवर अवलंबून राहू नये, असा इशारा दिला होता याची आठवण त्यांनी करून दिली. भारत आणि चीनमधील सीमारेषेवरून तणाव असूनही, दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक संबंध भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. चीनची व्यापारी व्याप्ती आणि आर्थिक शक्ती अमेरिकेपेक्षा खूप मोठी आहे. जागतिक व्यवस्थेत भारताने आपली स्वतंत्र आणि प्रभावशाली भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा जेफ्री यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आरोप केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील दशकांपूर्वीच्या धोरणात्मक प्रयत्नांना कमकुवत केले. या निर्णयामुळे भारताला अमेरिकेविरुद्ध वाटाघाटी करण्यासाठी रशिया आणि चीनसोबत सामील होण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते.
स्पेन, स्वित्झर्लंड सारख्या छोट्या देशांचाही विरोध
दरम्यान, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला आता जगभरातून प्रत्युत्तर मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशातच याची सुरुवात अमेरिकेच्या एम-३५ स्टिल्थ फायटर जेटवर झाला आहे. अनेक देशांनी स्टिल्थ फायटर जेटपासून चार हात लांब राहण्यास सुरुवात केली आहे. स्पेनने देखील एफ-३५ स्टिल्थ लढाऊ विमाने खरेदीच्या निर्णयाला अधिकृतरित्या स्थगित दिली. केवळ स्पेनच नव्हे, तर स्वित्झर्लंडने देखील एफ-३५ स्टिल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीपासून अंतर राखले आहे.

