फ्लोरिडातील केनेडी स्पेस स्टेशनवरून यान झेपावले
फ्लोरिडा : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी ब-याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन येथून अंतराळात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे एक्सिओम-४ मिशनसाठी झेप घेतली. बुधवारी दुपारी १२.०१ मिनिटांनी मिशन लॉन्च झाले. सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर हे ड्रॅगन अंतराळ यान आंतरराष्ट्रीय स्थानकात पोहोचणार आहे.
एक्सिओम-४ हे स्पेसएक्सचे ५३ वे ड्रॅगन मिशन आहे आणि १५ वी मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) यांनीही अंतराळात यशस्वी झेप घेतली. ही मोहीम आधी ८ जून रोजी सुरू होणार होती. पण खराब हवामानामुळे ती १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतरही पुढे-पुढे ढकलत आज अखेर २५ जूनला मुहूर्त लागला आणि शुंभाशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी अंतराळात उड्डाण केले.