मुंबई : प्रतिनिधी
आशिया चषकात १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सनी एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलेच झोंबले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, जर तुम्ही नियमावली वाचली तर, विरोधी संघासोबत हस्तांदोलन करण्याबाबत कोणताही नियम नाही. ही एक सद्भावनापूर्ण कृती आहे आणि एक प्रकारची परंपरा आहे. हस्तांदोलन करायलाच हवे, याबाबत कोणताही कायदा नाही, असे बीसीसीआयच्या अधिका-याने सांगितले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट आयसीसीकडे तक्रार करत सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मात्र पाकिस्तान बोर्डाची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यामध्ये अँडी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मोठी नव्हती, असे आयसीसीने म्हटले आहे. या सगळ्यात आता बीसीसीआयच्या एका अधिका-यांनी देखील हस्तांदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नियम नसून खेळभावनेचा भाग
क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य आहे, असे लिहिलेले नाही. हस्तांदोलन हा कसलाही नियम नसून खेळभावनेचा भाग मानला जातो. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भेटतात. हस्तांदोलन करण्याचा नियमच नाही, त्यामुळे टीम इंडियावर दंडाचा किंवा कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही.
















