न्यू यॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेतील न्यूयॉर्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला बेड्या घालून जमिनीवर पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अमेरिकेत भारतीयांविरुद्ध वाढत्या भेदभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याप्रकरणी भारतीय दूतावास हस्तक्षेप करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत इमिग्रेशन धोरणाच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांनी अमेरिकेला हादरवून सोडले आहे. यादरम्यान, न्यूयॉर्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला दिलेल्या अमानुष वागणुकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
संबंधित विद्यार्थ्याला बेड्या घालून जमिनीवर फेकण्यात आले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन व्यापारी कुणाल जैन यांनी हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी भारतीय दूतावासाला हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे. भारतीय दूतावासाने या घटनेवर म्हटले की, आमच्याकडे भारतीय विद्यार्थ्याला दिलेल्या अमानुष वागणुकीचा व्हिडिओ आला आहे. आम्ही या संदर्भात स्थानिक अधिका-यांच्या संपर्कात आहोत. भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी दूतावास नेहमीच वचनबद्ध आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणा-या भारतीयांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.