मस्कत : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान भारत आणि ओमान यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल ओमान सरकारकडून पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ ओमान’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.
या करारामुळे भारताच्या श्रमप्रधान क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे. विशेषत: वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, रत्न व दागिने, अभियांत्रिकी उत्पादने, प्लास्टिक व फर्निचर, कृषी उत्पादने, औषधे व वैद्यकीय उपकरणे, ऑटोमोबाइल क्षेत्र या क्षेत्रातील निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.
भारताचा खाडी सहयोग परिषद (जीसीसी) सदस्य असलेल्या संयुक्त अरब अमिरातीसोबत आधीच असा करार आहे, जो मे २०२२ पासून लागू आहे. जीसीसी मध्ये बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांचा समावेश आहे. भारत आणि कतार यांच्यातही लवकरच व्यापार करारासाठी चर्चा सुरू होणार आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारत-ओमानमधील मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, ऑटोमोबाइल, दागिने, कृषी-रसायने, नवीकरणीय ऊर्जा आणि ऑटो कंपोनंट्स क्षेत्रात नवे संधी निर्माण होतील. जीसीसी, पूर्व युरोप, मध्य आशिया आणि आफ्रिकेचे प्रवेशद्वार असल्याचे सांगितले. त्यामुळे भारतीय उद्योगांना जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक सुलभ प्रवेश मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

