16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeलातूरभालकी ते वलांडी नवीन एस. टी. बससेवा सुरू

भालकी ते वलांडी नवीन एस. टी. बससेवा सुरू

वलांडी : प्रतिनिधी
सीमा भागातील प्रवाशांची, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी आणि महिलांची दीर्घकाळची मागणी पूर्ण करीत अखेर भालकी डेपोची ‘भालकी-वलांडी’ ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ कर्नाटक राज्य वन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष हनुमंतराव चव्हाण आणि पाच हमी अंमलबजावणी समितीचे सदस्य दिलीप पाटील (मेहकर) तसेच भालकी डेपोचे वाहतूक नियंत्रक भद्रप्पा उडगे यांच्या हस्ते भालकी बसस्थानकावर हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
ही बससेवा भातंब्रा, हालसी, केसर, जवळगा, हुलसुर, कोंगळी, वांजरखेडा, तांडे, मेहकर, आटरगा, आळवाई, येलमवाडी मार्गे वलांडीपर्यंत चालवली जाणार आहे. दररोज सकाळी ६.३० वाजता भालकी येथून बस सुटेल, तर परतीची बस वलांडी येथून सकाळी ८.३० वाजता आळवाई, मेहकर , सायेगाव,जवळगा, भातंब्रा मार्गे भालकीकडे रवाना होईल. भालकी तालुक्यातील सीमा भागात ऑफिस, शाळा, कॉलेज तसेच दैनंदिन प्रवासासाठी कोणतीही नियमित बस उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त होते.
या पार्श्वभूमीवर बिदर येथील खासदार सागर ईश्वर खंडरे यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नांमुळे ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. मेहकर येथे बससेवेच्या प्रारंभानिमत्तिाने एसटी चालक भगवान गिरी आणि वाहक मारुती कंदगुळे यांचा पी.के.पी.एस. सोसायटीचे माजी अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी आणि पत्रकार दत्तात्रय साबणे यांच्या हस्ते शाल घालून सत्कार करण्यात आला. तसेच नवीन बसची पूजा विधिवत करण्यात आली.
या प्रसंगी पी.के.पी.एस. सोसायटीचे सदस्य कृष्णा गुबाळे, एम.डी. लोणे, गजानन मोळकिरे,  अनिल कराळे, गुंडप्पा परशेट्टे, भगवानराव कुलकर्णी, बसवराज मंगणे, शब्बीर बोंगे, मकबूल बॉम्बे, केरबा कांबळे, धनाजी ढोले यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.  नवीन बससेवेच्या शुभारंभानंतर भालकी व वलांडी परिसरातील नागरिकांनी खासदार सागर खड्रे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले आहेत. या बससेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR