लातूर : प्रतिनिधी
गेल्या १२ दिवसापासून गणरायाची मनोभावे गणेश भक्तांनी सेवा केली. पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्हयात डिजे व डॉल्बीमुक्त वातावरणात व पारंपारिक वाद्य हालगी, ढोल-ताश्याच्या गजरात लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत भावपूर्ण निरोप दिला.
चाकुरात भक्तिभावाने बाप्पांना निरोप
चाकूर : आझाद हिंद गणेश मंडळ चाकूर श्री चे विसर्जन डॉल्बीला फाटा देत पारंपारिक सवाद्य मिरवणूक काढली होती. गणेशभक्तांनी उत्साह आणि भक्तिभावाने बाप्पाना निरोप दिला. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर, गल्लीबोळांत ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात वातावरण दुमदुमले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह श्री गणेश निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिलांनी पारंपरिक नृत्य, तर तरुणाईने ढोल – ताशांच्या तालावर ठेका धरून उत्साहपूर्ण स्वरूप दिले.
















