सोलापूर – भावसार व्हिजन सोलापूर क्लबचा कृतज्ञता आणि वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच हॉटेल साईप्रसाद येथे पार पडला.यावेळी भावसार व्हिजनच्या आशिष जवळकर यांना बेस्ट डायरेक्टर,रेखा महिंद्रकर यांना बेस्ट व्हिजन मेंबर तर प्रणिता महिंद्रकर यांना भावसार समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे व सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर कटारे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी अध्यक्ष मल्लिनाथ बासुतकर व सचिव प्रणिता महिंद्रकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात सामूहिक गायत्री मंत्राने करण्यात आली.अध्यक्ष मल्लिनाथ बासुतकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि उपस्थितांचे स्वागत केले.आपल्या मनोगतात अध्यक्षांनी वर्षभरात ज्या सदस्यांनी विविध उपक्रमांसाठी सहकार्य केले त्यांना धन्यवाद दिले. यानंतर सचिव प्रणिता महिंद्रकर यांनी वर्षभरात भावसार व्हिजन ने केलेल्या कार्याचा
आढावा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सादर केले.
हर्षल माळवदकर यांनी क्लबचे पुढील वर्षाचे अंदाज पत्रक सादर केले,त्यास सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. यावेळी वर्षभरात भावसार व्हिजनने अडीच लाख रुपयांची २३ विविध सामाजिक प्रकल्प राबविले आणि त्याचा ९०७ गरजूंना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
समाज अध्यक्ष राजकुमार हंचाटे यांनी भावसार व्हिजन ने समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचे कौतुक करून विशेष आनंद व्यक्त केला आणि क्लबला पाच हजार रुपयाची देणगी जाहीर करून अध्यक्ष मल्लिनाथ बासुतकर यांच्याकडे सुपूर्त केले.
प्रसिद्ध उद्योजक किशोर कटारे यांनी देखील वर्षभरात व्हिजन ने केलेल्या कार्याचा गौरव केला आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून या पुढे आणखी उत्कृष्ट कामगिरी ते करतील असा विश्वास व्यक्त केला व त्यांना शुभे्छा दिल्या.
यावेळी सर्व संचालक व भावसार व्हिजन कलबला वर्षभरात उपक्रमासाठी ज्या मान्यवरांनी देणगी दिली त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माध्यम प्रतिनिधी रणजीत जोशी, माधवी कुलकर्णी, व धनंजय शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.
या सोहळयासाठी भावसार समाजातील गिरीश माळवदकर, चिंचुरे, राजू हिबारे, सरिता जवळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी उपरे यांनी केले तर सचिव प्रणिता महिंद्रकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.