पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांच्या अनेक उपाययोजनांनंतर गुन्हेगारी कमी होत नाही. किरकोळ कारणांवरून हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे मिळाले होते. त्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्या महिलेचा भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून नदीला पूर आला असताना त्यात मृतदेह फेकून दिला. एका खोलीच्या मालकी वादातून ही हत्या झाली.
पुण्यातील नदीपात्रात २६ ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला होता. पुणे शहरातील चंदननगर पोलिस ठाणाच्या हद्दीत मुळा-मुठा नदीमध्ये शीर, हात-पाय नसलेला मृतदेह आढळला होता. त्या सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा आहे. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून तिचा सख्खा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांनी तिची हत्या केली.
खोलीवरून भाऊ-बहिणीत वाद
पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीवरून भाऊ-बहिणीत वाद सुरू होता. या मालकीच्या वादातून ही हत्या झाली. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ अशपाक आणि वहिनी हमीदा तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तिची हत्या करण्याचा डाव त्यांनी रचला. २६ ऑगस्ट रोजी पुण्यात पाऊस होता. नदीला पूर आला होता. मग घरात धारदार शस्त्राने त्यांनी सकीनाची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिला.
सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती अशपाक याने शेजा-यांना दिली. मात्र शेजा-यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अशपाकची चौकशी केली. त्यातून या हत्येचा उलगडा झाला. सकीनाचा खून प्रकरणात पोलिसांनी अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे.