उदगीर : प्रतिनिधी
भाषा आणि वाड्.मविषयक प्रश्न निर्माण होतात तेव्हा साहित्य संस्थांची जबाबदारी अधिक वाढते. समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्य संस्थाना करावे लागेल असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेच्या पदग्रहण सोहळयात ते बोलत होते. व्यासपिठावर मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, कार्यवाह डॉ. दादा गोरे, उदगीर शाखेचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर, कार्यवाह प्रा. रामदास केदार उपस्थित होते. भाषाविषयक जाणिवा कमी होत असून या जाणिवा अभावी समाज पिछडला जात आहे, या जाणिवा निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्राचार्य ठाले पाटील म्हणाले. विविध भाषा अवगत असणे चांगले, मात्र मुळ भाषा सोडणे हा आत्मघातीपणा आहे. मराठी माणूस या आत्मघाताच्या दिशेने जात असल्याची खंत ठाले पाटील यांनी व्यक्त केली. स्वत:ची भाषा समृद्ध असल्याशिवाय ईतर भाषा अवगत करणे कठीण आहे. त्यामुळे मराठी विषयक जाणिवा प्रगल्भ कराव्या लागतील असे ठाले पाटील म्हणाले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्व शाखांमध्ये उदगीर शाखेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त केले. केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी उदगीरच्या साहित्य परिषदेने राबविलेल्या कार्याचा आढावा घेऊन साहित्य संमेलनामुळे उदगीर जागतिक पातळीवर पोहचल्याचे सांगितले. रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन तर विक्रम हलकीकर यांनी आभार मानले.
यावेळी मसापाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, सहकार्यवाह अनिता येलमटे, एकनाथ राऊत, सदस्य सुर्यकांत शिरसे, प्रा. डॉ. दत्ताहारी होनराव, विवेक होळसंबरे, प्रा. राजपाल पाटील, प्रा. प्रवीण जाहूरे, सुरेखा गुजलवार, प्रा. डॉ. म. ई. तंगावार,प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, अंबादास केदार, लक्ष्मण बेंबडे, राजाराम चव्हाण यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते. शाखेच्या पदाधिका-यांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

