भीमाशंकर : प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांनंतर भाविकांसाठी खुले झाले. विकासकामांमुळे ९ जानेवारी २०२६ पासून बंद असलेले मंदिर जिल्हाधिका-यांनी घालून दिलेल्या नियम व अटींनुसार १५ जूनपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. मात्र, केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनाच प्रवेश देण्यात आल्याने पहिल्याच दिवशी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात एक हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून वर्षभर लाखो भाविक, पर्यटक आणि निसर्गप्रेमी येथे भेट देत असतात. कोरोनानंतर भाविकांची वाढती गर्दी, अपु-या सुविधा आणि २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन २८८.१७ कोटी रुपयांच्या विस्तृत विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मंदिर परिसरात विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.
सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने दररोज फक्त एक हजार ऑनलाईन नोंदणीकृत भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला असून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी पहाटे पाच वाजता ब्रह्मवृंद आणि गुरव बांधवांनी शिवलिंगावर जलाभिषेक करून महाआरती केली. शंखनादानंतर मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यात आले आणि सकाळी सात वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. संकेतस्थळावरील नोंदणीतून सर्वप्रथम दक्षिण भारतातील मनोजकुमार सिंग यांनी दर्शन घेतले.
















