लातूर : एजाज शेख
आजही राज्यातील एक घटक असा आहे की, त्याला एक वेळ जेवण मिळण्याची भ्रांत आहे. ज्यांना रोजगार नाही, ते शहरात रोजगारासाठी जातात. मात्र उत्पन्न अत्यल्प असल्याने त्यांना स्वस्तात भोजनाची सोय नसल्याने भोजनासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. तसेच शासकीय कामानिमित्त शहरात, जिल्ह्याच्या गावात किंवा तालुक्याच्या गावात आल्यानंतर गरिबांना अत्यल्प दरात जेवण मिळावे, अशी अपेक्षा असते. ही गरज ओळखून तसेच समाजातील गरीब व कष्टक-यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने २६ जानेवारी २०२० साली शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. या गरीब व वंचित घटकांना शिवभोजन थाळी योजनेमुळे किमान एक वेळच्या जेवणाची हमी मिळाली खरी मात्र, आता सरकारच दुष्काळात कठोर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
शहरातील रुग्णालये, बसस्थानके, शासकीय कार्यालये, बाजारपेठेची ठिकाणे या ठिकाणी ही शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भोजनापासून गरीब, कष्टकरी वंचित राहू नयेत, त्यांचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी जिथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू केले आहे, त्याच ठिकाणी बसून भोजन करता येईल, अशी सोय करून देण्यात आली आहे. केंद्रातून बाहेर भोजन देण्यास शिवभोजन थाळी चालकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ शिवभोजन केंद्रावरच थाळी मिळणार आहे. थाळीपासून गरीब, कष्टकरी वंचित राहू नये, त्यांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रांवर ज्याला योजनेचा लाभ दिला, त्याचा आधारकार्ड क्रमांक नमुद करून त्याचा फोटो घेतला जातो.
लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ९४२ गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी आलेल्या मजुरांना अत्यंत कमी खर्चात पोटभर जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे शिवभोजन केंद्र. परंतु, दुष्काळात सरकारच कठोर होत आहे. शिवभोजन योजनाच नव्या नियमावलीच्या कचाट्यात सापडली आहे. नव्या नियमावलीनूसार शिवभोजन केंद्रातच बसून जेवण करता येणार आहे. पार्सलसेवा बंद झाल्याने स्थलांतरित मजुरांना शिवभोजन योजनेतून मिळणारा आधार हिरावला जाणार आहे. आर्थिक संकट काळात अवघ्या १० रुपयांत सकस आहार मिळाल्याने गरीब कुटुंबांचा जेवणावरील खर्च वाचला. दुष्काळात अन्नधान्य महागल्यामुळे गरिबांना पोषण मिळत नाही, अशा वेळी ही योजना पोषण मूल्य टिकवून ठेवण्यास कुपोषणावर मात करणारी ही योजना. परंतु, आता सरकारने नवीन नियमावली शिवभोजन केंद्र चालकांसोबत गरीबांनाही वेठीस धरले आले.
















