सोमवारी राजस्थानमध्ये २ आणि तेलंगणात १ भीषण रस्ता अपघात झाला. फलोदी, जयपूर आणि तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातांनी देश हादरून गेला. मद्याच्या नशेत डम्पर चालकाने एकामागोमाग १७ गाड्यांना व रस्त्यातील पादचा-यांना निर्दयपणे चिरडले. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. तेलंगणामध्ये खडी घेऊन जाणा-या डम्परने तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसला टक्कर दिली. या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. जयपूरमध्ये मद्यधुंद डम्पर चालकाने १७ हून अधिक वाहनांना चिरडले. या भरधाव वेगातील डम्परने कार आणि दुचाकींना धडक दिली. डम्परने सुमारे ५ कि.मी. अंतर भरधाव वेगात कापले.
समोर येणा-या वाहनांना डम्पर अक्षरश: चिरडत सुटला. अनेकांसाठी काळ ठरलेला डम्पर मंडी रोडहून आला होता. तो जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने जात होता. महामार्गावर जाण्याआधी चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर डम्परने अनेक वाहनांना धडक दिली. दुचाकींना चिरडल्याने रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला. काहींच्या मृतदेहांचे तुकडे रस्त्यावर पसरले. रस्त्याच्या कडेला उभे असलेले काही लोकही डम्परच्या कचाट्यात सापडले. राजस्थानमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर-ट्रक धडकेत १५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरात भारतमाला एक्स्प्रेसवेवर रविवारी संध्याकाळी उशिरा भीषण अपघात झाला. जोधपूरमधील सूरसागर येथील १८ जण एका टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बिकानेरमधील कोलायत मंदिरातील तीर्थयात्रेवरून परतत होते. हनुमान सागर चौकाजवळ भरधाव वेगाने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
ही धडक इतकी तीव्र होती की टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे चिरडला गेला. टेम्पोच्या सीट आणि पत्र्यामध्ये अनेक मृतदेह अडकले होते. भारतमाला एक्स्प्रेसवेवर टेम्पोचा वेग जास्त असणे आणि दृश्यमानता कमी असणे ही अपघाताची प्राथमिक कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा. रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबाद-विजापूर महामार्गावर भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. तांडूर डेपोची बस हैदराबादला जात असताना मिर्झागुडा गावाजवळ समोरून खडी घेऊन येणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बसवर आदळला. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळे बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. तसेच ट्रकमधील खडी बसवर ओतली गेल्याने त्याखाली प्रवासी दबले गेले. या अपघातात बस आणि ट्रकचालकांचा मृत्यू झाला. अपघातासंबंधीचे एक कारण असे सांगितले जात आहे की, अपघाताच्या काही वेळ आधी डम्पर चालकाचा एका कारचालकासोबत वाद झाला होता.
त्यामुळे संतापलेल्या डम्पर चालकाने सुसाट वेगाने वाहन चालवले होते. रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यातून होणारे मृत्यू थांबवण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. महामार्ग मंत्रालयाने यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. बांधा-वापरा-हस्तांतरित मॉडेल अंतर्गत (बीओटी) बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागात, एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदाराला दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अपघातांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी कंत्राटदार अधिक जबाबदार राहणार आहेत. एका विभागात ५०० मीटरच्या क्षेत्रात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास कंत्राटदाराला २५ लाख रुपये दंड आकारला जाईल, तसेच पुढील वर्षी परत अपघात झाला तर दंडाची रक्कम ५० लाखांपर्यंत वाढवली जाईल. मंत्रालयाने देशभरात ३५०० अपघातप्रवण क्षेत्रे चिन्हांकित केली आहेत. या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ज्यामुळे अपघातांची संख्या कमी होऊ शकेल. देशात दरवर्षी सुमारे १.८० लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच इतर रस्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग हे देशाच्या सर्व रस्त्यांच्या केवळ २ टक्के आहेत. पण अपघातांमधून होणा-या मृत्यूंच्या आकड्यात त्यांचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यात दुचाकी आणि पादचा-यांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. अतिवेग, वाहनचालकाचे चुकीचे वर्तन, हेल्मेट अथवा सीट बेल्ट न वापरणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे महामार्ग मंत्रालयाने कंत्राटदारांना अधिक जबाबदार ठरवून त्यांनी सुसंगत उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा ठेवली आहे. महाराष्ट्रातही रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक आहे. २०२४ मध्ये राज्यातील महामार्गावर ३६,०८४ अपघात घडले, त्यात १५,३३५ जणांचे जीव गेले. या चिंताजनक आकड्यांमुळे राज्य आणि केंद्र सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
देशात रस्ते अपघातात होणा-या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. २०२३ मध्ये ४.४४ लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले, जे २०२२ च्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक होते. गत दहा वर्षांत (२०१३-२०२३) अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे ११ टक्के वाढ झाली, हा गंभीर चिंतेचा विषय आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर कडक निर्बंध घालण्याची गरज आहे. वेग आणि तरुणाई यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे तरुणांमध्ये सुसाट वेगाने गाडी चालवण्याची क्रेझ वाढत चालली आहे. सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे होत आहेत. वेग मर्यादांचे उल्लंघन हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. मद्यापेक्षा अतिवेग जीवघेणा ठरतो आहे हे तरुणाईने लक्षात घ्यायला हवे. रात्रीच्या वेळी होणा-या अपघातांना प्रामुख्याने वाहनांचे प्रखर हेडलाईटस् कारणीभूत ठरत आहेत. खराब रस्ते हे तर अपघातांचे नेहमीचेच कारण बनले आहे.

