मुंबई : प्रतिनिधी
‘भूल भुलैया’ हा बॉलिवूडमधला सुपरहिट हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमाचे आतापर्यंत तीन भाग आले. पहिला भाग अक्षय कुमारच्या कॉमेडी आणि अभिनयामुळे आजही सर्वांच्या लक्षात आहे. तसंच विद्या बालननेही यामध्ये अप्रतिम काम केले होते.
तर सिनेमाच्या दुस-या आणि तिस-या भागात कार्तिक आर्यनने मन जिंकलं. आता सिनेमाच्या चौथ्या भागाची चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘भूल भुलैया ४’मध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसतील अशी शक्यता आहे.
‘भूल भुलैया’च्या यशानंतर दुस-या आणि तिस-या भागात सगळ्यांनीच अक्षय कुमारची आठवण काढली. ‘भूल भुलैया’ म्हटले की अक्षय कुमार अशीच छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी नुकतंच टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना चौथ्या भागाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘भूल भुलैया ४’च्या स्क्रिप्टचे काम अजून सुरु झालेले नाही. दुसरा आणि तिसरा भाग बनवलाय तर चौथाही बनेलच. चर्चा सुरु आहे पण अद्याप आम्ही काहीच निर्णय घेतलेला नाही. रुह बाबाच्या भूमिकेत कार्तिक आर्यनने आपली चांगली ओळख बनवली आहे त्यामुळे तो तर सिनेमात असलाच पाहिजे.
‘भूल भुलैया’फ्रँचायझीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. २००७ साली पहिला भाग आला होता. यानंतर १५ वर्षांनी २०२२ साली दुसरा भाग आला. याच्या दोन वर्षांनी २०२४ साली तिसरा भाग रिलीज झाला. तीनही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
















