Homeमहाराष्ट्रभोंदूबाबाला तर ठोकूनच काढले पाहिजे

भोंदूबाबाला तर ठोकूनच काढले पाहिजे

दत्तात्रय भरणेंचा सूर बदलला

मुंबई : प्रतिनिधी
नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी आपली भूमिका बदलत भोंदूबाबा खरात याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी जेव्हा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले, तेव्हा दत्तात्रय भरणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणाची तरी भेट झाली किंवा फोटो काढला, तर त्यात चाकणकरांची काय चूक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात काहीही गैर नाही, असे म्हणत त्यांनी चाकणकरांचा बचाव केला होता.

मात्र, आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भरणे यांनी आपली भूमिका बदलली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा मी आधी बोललो होतो, तेव्हा मला अशोक खरात याच्याबद्दल सविस्तर माहिती नव्हती. हे प्रकरण नेमके काय आहे, याची कल्पना नव्हती. पण आता सत्य समोर आल्यावर समजले की तो एक भोंदूबाबा आहे. अशा लोकांना वेगळ्या प्रकारे अद्दल घडवली पाहिजे.
अशांमुळे सर्वांची बदनामी होते

दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत, पण अशा एक-दोन लोकांमुळे सर्वांची बदनामी होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR