भाईंदर : काशीगाव पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या महिलेला तिच्या नव-याची आणि भावाची दारू सोडवतो असे सांगत भोंदू बाबाने महिलेकडून दागिने आणि रोख रक्कम अशी ६ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.
काशीगाव येथील जनतानगर झोपडपट्टीमध्ये राहणा-या महिलेला त्यांच्या चाळीमध्ये राहणारे अयोध्या प्रसाद गिरी हे दारू सोडविण्याचे औषध देतो, मला तंत्र-मंत्र विद्या अवगत असून मी भूतप्रेत लागीर, बाधा झालेल्या लोकांवर उपचार करतो, त्यांची त्यातून मुक्तता करतो असे सांगितले.
महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन भोंदुगिरी, बुवाबाजी करून, त्याने तिच्या नव-याची आणि भावाची दारू सोडवतो तसेच तुमच्या पतीला जिन लगा है, वो आठ दिन मे मरनेवाले है.. अशी भीती दाखवली. त्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून तसेच गुप्तधन काढून देतो असे सांगत त्याने महिलेकडून २ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम व ८४ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली.