मुंबई : प्रतिनिधी
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर मंत्रालयाला म्हणजे सरकारी कामकाजाला याचा मोठा फटका बसला. रविवारी (१७ ऑगस्ट) रात्रीपासून कोसळणा-या मुसळधार पावसाची मोठी झळ मंत्रालयाला सोमवारी बसली. उशिराने धावणा-या लोकल ट्रेन, ठिकठिकाणी तुंबलेले पाणी, वाहतुकीची कोंडी यामुळे मंत्रालयात सोमवारी (१८ ऑगस्ट) सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांची उपस्थिती जेमतेम होती. केवळ १७.६७ टक्के कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे बहुतांश विभागांमधील खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यातच पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन आलेल्या कर्मचा-यांना दुपारी ४ वाजता कामावर घरी जाण्याची मुभा देण्यात आली होती.
मुंबईत शुक्रवारपासून (१५ ऑगस्ट) संततधार आहे. त्यातच रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्यामुळे सोमवार सकाळपासून मुंबईची वाहतूक कोलमडायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रुळ पाण्याखाली गेल्याने लोकल ट्रेन हळूहळू धावत होत्या. काही ठिकाणी प्रवाशांना लोकलमधून उतरून रुळामधून मार्ग काढण्याची वेळ आली. रुळांवर पाणी साठल्याने १० मिनिटांच्या अंतराला अर्धा तास लागत होता. लोकल ट्रेन सुमारे तासभर उशिराने धावत होत्या. त्यातच रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली. परिणामी नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे शक्य होत नव्हते.
याचा परिणाम मंत्रालयातील कामकाजावर झाला. अनेक अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत. तर पावसाचा जोर आणि मुंबईला असलेला रेड अलर्ट यामुळे अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरणे पसंत केले. तर काहींनी बातम्यांचा अंदाज घेऊन घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे मंत्रालयात जवळपास ८३ टक्के अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित होते. पुरेशी संख्या नसल्याने विविध विभागांच्या बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, संपूर्ण मुंबई शहराला अतिवृष्टीचा असलेला धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ४ नंतर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात मंत्रालय रिकामे झाले. विशेष म्हणजे पावसाचा असलेला जोर पाहून मंत्रालयात कामानिमित्त येणारे लोक फारसे फिरकले नाहीत. त्यामुळे मंत्रालयात फारशी गर्दी नव्हती.

