शेती रस्त्याच्या वादातून झाली मारहाण, चुलतभाऊ गंभीर जखमी
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शेती आणि रस्त्याच्या वादातून मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतण्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. अमेय अजित सावे (३५) आणि अजित मोरेश्वर सावे (७०) हे दोघे मारहाणीत जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी मंत्री अतुल सावे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
मंत्री सावे म्हणाले की, पैठण तालुक्यातील नायगाव खांदेवाडी येथे माझ्या पुतण्याचा गेल्या २ वर्षांपासून काँक्रिट प्लांट आहे. तिथे सर्व काम नियमाने आणि व्यवस्थित सुरू होते. मात्र, अचानक काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गाडी आणून तिथला रस्ता अडवला आणि ‘इथून गाडी घेऊन जाऊ नका’ अशी दमदाटी सुरू केली. माझ्या भावाने मध्यस्थी करत, ‘रस्त्याचा काही विषय असेल तर आपण शांततेत बोलू, जिल्हाधिका-यांना पत्र देऊ आणि हवे असल्यास अधिकृत मोजणी करू’ असे सांगितले. परंतु त्या लोकांनी काहीही न ऐकता थेट मारहाण केली. घटनास्थळी भावाला धक्काबुक्की होत असल्याचे पाहून जेव्हा माझा पुतण्या त्यांना समजवायला गेला, तेव्हा त्या गुंडांनी त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. त्यांनी बुलेट गाडीच्या लोखंडी रॉडने आणि हातातील कड्याने पुतण्याच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुरुवातीला त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेऊन टाके घालण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने आता त्याला छत्रपती संभाजीनगरमधील सिग्मा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
मारहाण करणारे स्थानिक गुंड असून त्यांना या भागात दादागिरी करण्याची सवय जडली आहे. खंडणीसाठी हे लोक काहीही करायला तयार होतात. आज त्यांनी दादागिरीच्या उद्देशानेच हे कृत्य केले, पण रॉडने मारल्यामुळे प्रकरण एवढे गंभीर होईल, याचा अंदाज त्यांना आला नसावा. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी केवळ मारहाणच केली नाही तर माझ्या भावाच्या खिशातील पैसेही काढून घेतले आणि माझ्या वाहनचालकाला जातिवाचक शिवीगाळ केली, असेही ते म्हणाले.
















