छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे माझ्या राजकीय जीवनात मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या मदतीमुळेच मला विधान परिषदेवर आमदार होता आले, याची आठवण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना झाली. मतदारसंघातील गेवराई सेमी गावातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लवकरच गावात आणि सिल्लोड शहरात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली.
महायुती सरकारच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. गेवराई सेमी गावात आनंदाचा शिधा वाटप करत असताना त्यांनी गावातील नियोजित जागेवर कुदळ मारून भूमिपूजन केले. गोपीनाथराव मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे सांगतानाच त्यांच्या मदतीमुळेच मी विधान परिषदेवर आमदार होऊ शकलो, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या पुतळा उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मनस्वी आनंद होत आहे. सिल्लोड शहरात देखील लवकरच गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा सत्तार यांनी यावेळी केली. अब्दुल सत्तार मित्रमंडळ व तालुका शिवसेनेच्या वतीने शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधासाठी लागणारे १०० रुपये शुल्क भरण्यात येत आहे. मतदारसंघात शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि खाद्यतेल याचा समावेश असलेला आनंदाचा शिधा मोफत देण्यात येत आहे.
मतदारसंघात २५० स्वस्त धान्य दुकाने असून या अंतर्गत जवळपास ६० हजार शिधापत्रिकाधारक आहेत. दोन महिन्यांनी होणा-या विधानसभा निवडणुकीची तयारी अब्दुल सत्तार यांनी सुरू केली आहे. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून सत्तार सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत.