अमरावती : प्रतिनिधी
राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, बच्चू कडू इथे उपोषणाला बसले आहेत. इथे या मंडपात नाही आलात, तरी चालेल; पण आज या क्षणापासून महाराष्ट्राच्या कानाकोप-यामध्ये जिथे-जिथे हे मंत्री पोलिसांचा ताफा घेऊन फिरतील, त्या मंत्र्यांना भरसभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही, असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
अमरावतीमधील मोझरी येथे बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी कर्जमाफीसह काही मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र डागले.
‘तुम्ही शेतकरी कर्जमाफी करणार आहात ना? तुमच्यावर आमचा विश्वास नाही. आमच्या कर्जाची जबाबदारी घ्या. तुम्ही २०२९ मध्ये भरा, २०४० मध्ये भरा, आम्हाला काय करायचं? आमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची जबाबदारी घ्या. ते कर्ज गोठवा. त्याचं व्याज बंद करा. जसं तुम्ही साखर कारखान्यांच्या कर्जाची हमी घेऊन बँकांना सांगितलं की, ते कर्ज आम्ही भरू. तशी तुम्ही शेतक-यांच्या कर्जाची जबाबदारी घ्या. आणि शेतक-यांना यातून मोकळं करा’, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
राजू शेट्टी म्हणाले, यांना लाज वाटली पाहिजे. ३० हजार, ४० हजारांमुळे शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत. यांच्याकडे पैसा नाही का? हजारो, लाखो कोटींचे मोठमोठे प्रकल्प उभे करायला यांच्याकडे पैसे कुठून येतात?
ठेकेदारांसाठी, तुमच्या हो ला हो म्हणणा-या तुमच्या विधानसभेतील सहका-यांना खुश करण्यासाठी. त्यांची ठेकेदारी, त्यांची दलाली चालावी, यासाठी हजारो कोटींचे कर्ज काढून तुम्ही हे प्रकल्प घेता. आणि भोळ्याभाबड्या गरीब शेतक-यांना, दिव्यांगांना किती द्यावे लागणार आहेत? त्यांना देण्यासाठी जर का तुमच्याकडे पैसे नसतील, तर आज गरिबांसाठी न्याय मागणारे लोक तुमच्या छाताडावर बसून तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाहीत, हे या सरकारमधील लोकांनी लक्षात ठेवावं’, असा संताप राजू शेट्टींनी व्यक्त केला.
सरकारकडे आपण चंद्र, सूर्य, तारे मागतोय का?
इथे येऊन बसून काहीही उपयोग नाही. यांना सामान्य माणसाची भीती वाटली पाहिजे. सामान्य माणसाची दहशत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपला काहीतरी टिकाव लागेल. आपल्याकडे लक्ष देतील. आपण त्यांना काय चंद्र, सूर्य, तारे आणायला सांगत आहोत का? आपण यांच्याकडे न्याय मागतोय’, असे राजू शेट्टी म्हणाले.