मुंबई : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन वादात सापडले आहेत. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेत अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकरणावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे मंत्री महाजन यांना उद्देशून म्हणाले की, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात गिरीश महाजन यांना इशारा दिला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा असून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वत: या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांना नडणा-या महिला वन कर्मचारी माधवी जाधव यांचे त्यांनी कौतुकही केले. राऊत म्हणाले, २६ जानेवारीच्या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी भारताला संविधान मिळाले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला हवी हे सत्य आहे. त्यामुळे त्या महिलेचा देखील सन्मान व्हायला हवा. त्यांनी ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये असतानाही निषेध व्यक्त केला, मी त्यांचे देखील कौतुक करतो असे राऊत म्हणाले. परंतु आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेले आहे. आता फार विषय ताणू नका, असा खोचक टोलाही राऊत यांनी मारला.

