Homeपरभणीमजुराच्या लेकीची पोलिस शिपाई पदाला गवसणी

मजुराच्या लेकीची पोलिस शिपाई पदाला गवसणी

अजदापुरच्या सीमा हिवरेने जिद्द, परिश्रमाच्या बळावर मिळवले यश

पुर्णा : हालाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत दिवसरात्र मजुरी करून मुलांना शिकवणा-या बापाच्या कष्टाला अखेर गोड फळ मिळाले आहे. पुर्णा तालुक्यातील अजदापुर येथील मजूर काम करणा-या नामदेव हिवरे यांची मुलगी सीमा हिवरे हिने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परभणी पोलिस भरतीत यश संपादन करत महिला पोलिस शिपाई पदाला गवसणी घातली आहे. तिचे हे यश ग्रामीण विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे.

सीमाचे वडील नामदेव हिवरे हे मजूर म्हणून दुस-या शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी कोणतीही तडजोड न करता तिला शिकवले. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत सीमानेही शिक्षणासोबतच पोलिस दलात दाखल होण्याचे लक्ष्य निश्चित केले. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतरह्यााध्यमिक शिक्षण पुर्णा शहरातील अभिनव शाळेत पूर्ण केले.

पुढे श्री. गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयातून १२वीपर्यंतचे शिक्षण घेत ८२ टक्के गुणांसह प्राविण्य मिळवत महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या सीमाने पोलिस भरतीचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत कठोर परिश्रम, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर परभणी येथे पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत १०५ गुण मिळवत यादीत ९४ वा क्रमांक मिळवत महिला पोलिस शिपाई पदावर निवड निश्चित केली.

सीमाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून गावासह संपूर्ण पुर्णा तालुक्यात तिचे कौतुक होत आहे. तिच्या या यशाने मेहनती बापाच्या कष्टाचे चीज झाले आहे. अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरत असून सीमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR