26.9 C
Latur
Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रमतदानादरम्यान राडा

मतदानादरम्यान राडा

धर्माबादमध्ये मतदारांना कोंडले, कुठे बाचाबाची, तर कुठे तक्रारी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडले असून मतदानाची अधिकृत वेळ संपली तरीही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते. आज अनेक ठिकाणी शांततेत मतदान झाले. परंतु काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागले. धर्माबादमध्ये (जि. नांदेड) महिलांना मंदिरात आणि मंगल कार्यालयात डांबून ठेवले. मात्र, धर्माबादच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी याचा इन्कार केला आणि यासंबंधी चौकशीचे आदेश दिले. अंबरनाथमध्येही बोगस मतदार आणल्याच्या आरोपावरून भाजप-शिवसेना शिंदे गटात वाद झाला. शिंदे गटाने भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला. ऐनवेळी गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. गडहिंग्लजमध्येही २ गटात वाद झाला. बारामतीमधील अहिल्यादेवी क्लब मतदानकेंद्रात बोगस मतदान झाल्याची तक्रार करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना मंदिरात व मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. बोगस मतदान ईव्हीएम मशिन्समध्ये झालेला गोंधळ, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा आणि पोलिसांचा लाठीचार्ज अशा वातावरणात आज २३ ठिकाणी मतदान झाले. धर्माबादमध्ये नगरपरिषद निवडणुकीत मतदानासाठी निघालेल्या गोरोबाकाका मंदिरात शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचे वृत्त समोर आले. भाजपच्या पदाधिका-यांनी पैशाचे आमिष दाखवून सकाळपासून मंगलकार्यालयात बोलावले. भाजपचे आमदार राजेश पवार यांचा फोटो असलेल्या मोटारीतून कार्यकर्ते पळून गेल्याचे सांगण्यात येते. पोलिस येताच काही पदाधि-यांनी उंच भिंतीवरून उड्या मारून पळ काढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच धर्माबाद बोगस महिला मतदाराला पकडले. बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एका महिला आणि पुरुषाला जोरदार मारहाण करण्यात आली. मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तेलंगणातून मतदार आणल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र, मतदारांना डांबून ठेवल्याच्या वृत्ताचा निवडणूक अधिका-यांनी इन्कार केला.

अंबरनाथमध्येही २०८ बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपने शिंदेंच्या सेनेवर केला. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा आरोप भाजपच्या अभिजीत करंजुलेंनी केला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. त्यावरून मातोश्रीनगर परिसरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसनेने केला होता. यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. सिन्नर नगर परिषदेच्या ३ जागांसाठी मतदान झाले. प्रभाग २ च्या मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडण्यात आले. पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २ मधील बोगस मतदार न वगळल्याने माजी नगरसेवकाकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

अंबरनाथला १७४ बोगस
महिला मतदारांवर गुन्हा
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदानासाठी बाहेरुन आणण्यात आलेल्या १७४ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या महिलांना ज्या मॅरेज हॉलमध्ये ठेवण्यात आले होते, त्याच्या मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. या मॅरेज हॉलच्या मालकाचे नाव कृष्णा रसाळ असे असून तो शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे.

जळगावमध्येही शाब्दिक चकमक
जळगावच्या भुसावळमध्ये पोलिस आणि उमेदवारामध्ये शाब्दिक बाचाबाची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भावना पवार यांना मतदान केंद्रात जाऊ दिले नाही. त्यावरून बाचाबाची झाली. कोपरगावमध्ये सत्ताधारी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR