29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रमतदान कार्डच्या गठ्ठ्यासह बोगस मतदार पकडला!

मतदान कार्डच्या गठ्ठ्यासह बोगस मतदार पकडला!

अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत बोगस मतदारांना पकडण्यात आले आहे. केडगाव आणि सावेडी उपनगरात हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, बोगस मतदारांना पकडून उमेदवारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या बोगस मतदारांकडे मोठ्याप्रमाणात बोगस मतदान कार्डचा गठ्ठा सापडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोगस मतदारांमागील सूत्रधार कोण याचा शोध घ्या? तसेच बोगस मतदान करायचे असेल, तर मतदान प्रक्रिया बंद करा, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत गोंधळ उडाला.

अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात प्रभाग क्रमांक तीनमधील आनंद विद्यालयात मतदान केंद्रावर निवडणूक कार्डासह दोन बोगस मतदारांना पकडण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली. या दोघांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळली. मतदान केंद्रावरील उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला.

या बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे मोठे कटकारस्थान आहे. हे प्यादे आहेत, त्यांच्यामागील मोठ्या सूत्रधाराचा शोध घ्या, अशी मागणी केली. पोलिसांनी देखील या दोघांकडे सखोल चौकशी सुरू केली असून, बनावट ओळखपत्रे कोणी व कुठे तयार केली? यामागे कोणाचा हात आहे? एखाद्या संघटित टोळीचा प्रकार आहे का? एखाद्या उमेदवाराशी याचा थेट संबंध आहे का? या सर्व बाबींचा तपास सुरू केला आहे.

ही ओळखपत्रे अत्यंत शिताफीने तयार करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात बोगस मतदारांचा सुळसुळाट होण्याची शक्यता असल्याने उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

उमेदवारांची जोरदार घोषणाबाजी
या बोगस मतदानावरून अहिल्यानगरच्या सावेडी भागातील मतदान केंद्रावर वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर एकत्र येत, जोरदार घोषणाबाजी केली. ‘बोगस मतदान थांबवा’, ‘सूत्रधार शोधा’, ‘बोगस मतदान थांबवता येत नसेल, तर मतदान थांबवा’, ‘बंद करा, बंद करा, मतदान बंद करा’, ‘बोगस मतदान बंद करा’, अशा घोषणा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR