आयोग सत्ताधा-यांच्या
हातचे बाहुले : राज ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी
मतदार याद्यांच्या घोळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलेले असताना आणि त्यासंबंधी पुरावे दिलेले असतानाही त्याची दखल न घेता निवडणूक आयोगाने राज्यात नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तर निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनली असल्याची आता खात्री पटली असल्याचे म्हटले. दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ््यावर प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमच्या पदांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करीत आता १०० टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, ते फक्त संविधानातच, अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तराची महाराष्ट्रातील जनतेने क्लिप जरुर पाहावी, तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून झाला हे तुम्हाला कळेल, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील त्रुटींचा मुद्दा मांडला. मात्र, सत्ताधारी महायुतीने विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या बंगल्याच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे नोंदल्याच्या विरोधकांच्या प्रश्नावर बोलताना वाघमारे यांनी मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा वेगळी आहे. आम्ही फक्त यादी वापरतो. दुबार मतदार असतील किंवा चुकीच्या प्रभागात नाव गेले असल्यास ते तपासतो, असे म्हणत बोगस मतदारांबाबत जबाबदारी झटकली.
















