घोषणांचा पाऊस नको ; अंमलबजावणी कधी करणार, हे सांगा
युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतक-यांच्या बांधावर
औसा : प्रतिनिधी
युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शेतक-याच्या बांधावर जाऊन शेतक-याच्या पिकाची पाहाणी केली. तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व तुम्ही घाबरून जाऊन आपल्या जिवाचे काही बरे वाईट करून घेऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा येथील शेतक-यांना धीर दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणांचा पाऊस न पाडता मदत कधी आणि किती देणार, हे मीडियासमोर येऊन जाहीर करावे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने या भागात शेतक-यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून पावसाअभावी रबीची पेरणी होण्याची शक्यता मावळली आहे. सतत निसर्गाच्या संकटात सापडणा-या औसा तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली असून सत्ताधारी फक्त घोषणा करत आहेत. सध्या या भागातील शेतक-यांना तातडीच्या उपायोजना सुरू होणे गरजेचे असताना देखील हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत असून काढलेला जीआर हा फसवा असू शकतो. त्यामुळे जीआरमध्ये कोणती व कशी मदत देणार, याचा उल्लेख नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ मीडियासमोर येऊन शेतक-यांची होणारी अडचण तात्काळ दूर करावी. येथील शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे पाप सरकार करीत आहे.
भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कोणताही घटक सुखी व समाधानी नसल्याची खंत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली असून सरकार केवळ घोषणाबाजीत मग्न असून दिलेल्या घोषणांची अगोदर पूर्तता होते की नाही, हेदेखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. अशा दगाबाज सरकारला वटणीवर आणण्याचे काम आपणाला येणा-या काळात करावे लागणार असून त्यासाठी शिवसेना, युवा सेनाचे पदाधिकारी, आजी-माजी कार्यकर्ते यांनी आतापासूनच कामाला लागावे आणि या भाजपाचा खरा मुखवटा सर्वसामान्य मतदारापर्यंत आणण्याचे कार्यही युवा सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी करून दाखवावे, असे आवाहन यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना केले.
औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील तावशी ताड येथे आले होते. त्यांनी येथील शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. यावेळी औसा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक तसेच युवा सेना प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, उमरगा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, बजरंग जाधव, शिवराज मुळगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्री उटगे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, आकाश माने सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार, शहर प्रमुख सुरेश भूरे, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पळकुटे मुख्यमंत्री
या भागात परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्ताची पाहणी करण्यासाठी आले असता येथील शेतकरी बांधव रोडवरती येऊन मोठ्या प्रमाणात थांबले असल्याचे आताच मला येथील कार्यकर्त्यांनी सांगितले असून मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी क्षणभरही थांबले नाहीत, अशा मुख्यमंत्र्यांना पळकुटे मुख्यमंत्री म्हणावे लागेल.
शेतकरी महिलांशी साधला संवाद
या ठिकाणी महिला शेतकरी वर्गांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी येथील उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व शिवसेना आणि युवा सेना पाठीशी खंबीरपणे उभी आहे, घाबरून जाऊ नका, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.
उपोषण स्थळास भेट
दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांची तावशी ताड येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशा प्रकारचा उपोषणकर्त्याला धीर दिला.
















