मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळातील चालकांच्या मद्यपानाच्या प्रकारांबाबत गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाने कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्यातील सर्व आगारांत चालकांची कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ ऍनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्तव्यावर असताना मद्यपान करणा-या चालकांविरुद्ध तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी २५ जानेवारीला परळ बसस्थानकाला अचानक भेट दिल्यानंतर ही कारवाईची चक्रे वेगाने फिरली. या भेटीदरम्यान चालक-वाहक विश्रांतीगृहांमध्ये मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचा-यांनी कर्तव्यावर जाण्यापूर्वी मद्यपान केल्याचेही निदर्शनास आले.
प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही मोहीम अधिक काटेकोरपणे राबवली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता (चालन) विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा आणि संबंधित अधिका-यांना परिपत्रक पाठवून या सूचनांची माहिती देण्यात आली आहे. कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केले नसल्याची खात्री करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
तपासणी अधिक कडक
परिपत्रकानुसार, कर्तव्यावर जाणा-या प्रत्येक चालकाची मद्यपानाबाबत खात्री करूनच त्याला ड्युटीवर पाठवावे, ज्या वाहनावर चालकाची नेमणूक आहे, त्या वाहनासोबतच त्याची ब्रेथ ऍनालायझर चाचणी घ्यावी, वाहन परीक्षकांनी चालकाची तपासणी न करता कोणतेही वाहन बाहेर जाऊ देऊ नये, मद्यपान केल्याचे आढळल्यास संबंधित चालकाला तत्काळ कर्तव्यातून दूर ठेवून आगार व्यवस्थापकांना माहिती द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी
अशा प्रकरणांमध्ये आगार व्यवस्थापकांनी स्वत: खातरजमा करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची तातडीची कारवाई करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मुख्यालयाकडून अचानक तपासण्या (सरप्राईज चेक) घेतल्या जाणार असल्याने सर्व आगारांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासी सुरक्षेला प्राधान्य
एसटी ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे चालकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती सुदृढ असणे अत्यावश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे ही गंभीर बाब मानून महामंडळाने ‘शून्य सहनशीलता’चे धोरण अवलंबल्याचे या परिपत्रकातून स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल आणि एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

