लातूर : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय शहरात पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग व कमानी लावू नयेत अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा महापौर जयश्री सोनकांबळे यांनी दिला. महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहरात शहरातील डिजिटल बॅनर्सचे प्रिंटर्स व बॅनर लावणा-या एजन्सीचे प्रतिनिधी यांची बैठक बुधवार दि. १३ मे रोजी झाली. आयुक्त श्रीमती मानसी, उपमहापौर स्नेहल उटगे, सभागृह नेते विजयकुमार साबदे, उपायुक्त वसुधा फड व शहरातील तीन्ही प्रमुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची या बैठकीस उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना महापौर श्रीमती सोनकांबळे म्हणाल्या की, न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिका क्रमांक ढकछ ठड झ्र १५५/२०११ वरील आदेश दि. ३१ जानेवारी २०१७ चे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. महाराष्ट्र मालमत्ता विरूप्पन प्रतिबंध कायदा १९९५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये शहरांमध्ये अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग व कमानी लावणा-यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने शहरातील सर्व प्रिंटर्सनी बॅनर्सची छपाई करताना त्यावर मनपाकडून घेतलेल्या परवानगीचा क्रमांक, परवाना कालावधी, ज्या ठिकाणी बॅनर्स लावावयाचे आहेत त्या ठिकाणाचे नाव,प्रिंटर्सचे नाव व प्रकाशकाचे नाव छापणे बंधनकारक आहे.प्रिंटर्सनी मनपाच्या परवानगीशिवाय बॅनरची छपाई करू नये.विनापरवाना बॅनर्स लावणा-यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. बॅनर्स लावणा-या एजन्सीने विजेचे खांब,झाडे, दुभाजक यावर बॅनर्स लावू नयेत, अशा सूचनाही महापौरांनी केल्या.
क्षेत्रीय अधिका-यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अनधिकृत बॅनर लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आदेशही महापौरांनी दिले. शहरात महानगरपालिकेच्या ३८ व खाजगी ९४ जागा बॅनर्स लावण्यासाठी मनपाने निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणीच बॅनर्स लावावे, असेही त्या म्हणाल्या. शहरातील नागरिकांनी अनधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होर्डिंग व पोस्टर्स या संदर्भात तक्रार असल्यास मनपाच्या १८००२३३१३८८ या टोल फ्री क्रमांकावर कार्यालयीन वेळेत नोंदवावी.या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाईल. मनपाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे फलक प्रिंटिंग प्रेस आस्थापनेच्या बाहेर लावणे बंधनकारक असल्याचेही महापौर जयश्री सोनकांबळे यांनी या बैठकीत सांगितले
















