लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात ३६१ खाजगी जाहिरात एजन्सींनी शहरातील उंच उंच इमारतींवर मोठ मोठे होर्डिंग बसवलेले आहेत. परंतू, गेल्या ९ वर्षांत होर्डिंग उभे केलेल्या इमारतींची स्ट्रक्चर स्टॅबिलिटी कोणीही तपासली नाही. घाटकोपरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या अनुषंगाने ‘एकमत’ दि. १५ मे रोजी ‘लातूर शहरावर होर्डिंगचा धोका घोेंगावतोय’, या मथळ्याखाली सविस्तर वृत्तांत दिले होते. त्याची दखल घेत लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील २०*२५ आकाराचे सहा धोकादायक होर्डिंग बुधवारी दिवसभरात काढले. शहरातील अनधिकृत सर्वच होर्डिंग काढण्याची कारवाई केली जात असल्याचे मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
लातूर शहरात ३६१ जाहिरात खाजगी एजन्सींनी शहरातील मोठ-मोठ्या इमारातींचे टेरेस बुक केलेले आहेत. इमारतींच्या टेरेसवर लोखंडी सांगाडा उभा करुन त्यावर जाहिरातीचा मजकुर असलेले बॅनर चिकटवले जाते. उन, वारा आणि पावसाने बॅनर जिर्ण होऊन फाटते. फाटलेले बॅनर वादळी वा-याने हेलकावे खात आहेत. त्यामुळे होर्डिंगचे लोखंडी सांगाडेही हलत आहेत. या सांगाड्याचे फाऊंडेशन कमकुवत होऊन कधी हे सांगाडे इमारतींवरुन खाली कोसळतील हे सांगता येत नाही. या संदर्भाने ‘एकमत’ने सविस्तर वृत्त दिल्यानंतर लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहिम हाती घेतली आहे. शहरातील सर्व अनधिकृत धोकादायक होर्डिंग काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
लातूर शहर महानगरपालिका मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी शहरातील अनधिकृत धोकादायक होर्डिंग काढण्याची मोहिम सुरु करण्यात आली. पहिल्या दिवशी तहसील कार्यालय परिसरातील २०*२५ आकाराचे सहा होर्डिंगचे लोखंडी सांगाडे कट करुन काढण्यात आले. ही मोहिम लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशाने उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्या नेतृत्वाखाली मनपा मालमत्ता विभाग प्रमुख रवि कांबळे, पांडूरंग सुळ, अजय घोडके, महेंद्र घोडके यांनी राबविली.