लातूर : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मेन रोडवर आरपार मोठा खड्डा पडला आहे. त्यातच या ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी होत आहे. महात्मा गांधी चौकातून येणारे प्रत्येक वाहनाला या खड्ड्यामुळे ब्रेक लागत असल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. एखाद्या गल्लीबोळातील ही परिस्थिती असती तर ठिक पण मेन रोडवरील मध्यवर्ती बसस्थानकासमोरच रस्त्यावर खड्डा पडला, जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असेल तर लातूर शहर महानगरपालिकेला हा खड्डा आणि फुटलेली जलवाहिनी दिसेल का?, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
लातूर शहर महानगरपालिकेत गेली सात वर्षे प्रशासक राज सुरु आहे. नागरिकांचे प्रश्न, गा-हाणे मांडून त्याची सोडवणुक करुन घेणारे लोकप्रतिनिधी महानगरपालिकेत नसल्यामुळे नागरी प्रश्नांचा गुंता वाढतच चालला आहे. प्रश्न, समस्या सुटण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर मेन रोडवर आरपार मोठा खड्डा पडला आहे. महात्मा गांधी चौकाकडून गंजगोलाईकडे जाणारे प्रत्येक वाहनाला या खड्ड्यामुळे ब्रेक लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. नांदेड, उदगीर, अहमदपूर, चाकुर या मार्गे आलेल्या एस. टी. बसेस विवेकानंद चौकातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, सम्राट चौक, नांदेड रोड, जुना गुळ मार्केट चौक, महात्मा गांधी चौक मार्गे मध्यवर्ती बसस्थानकात येतात. दररोज असंख्य बसेस मध्यवर्ती बसस्थानकात येतात. परंतू, या खड्ड्यामुळे प्रत्येक बसला ब्रेक लागत आहे. परिणामी महात्मा गांधी चौकापासून मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत वाहतुकीची कोंडी होत आहे.
या खड्ड्याचा त्रास वाहनधारकांना तर होतोच आहे. परंतू, या परिसरात हॉस्पिटल्स, विविध व्यवसायिकही आहेत. एखाद्या रुग्णाला या परिसरातील हॉस्पिटलला जायचे असेल तर वाहतूक कोंडीची मोठी अडचण होते. किंवा या परिसरातील हॉस्पिटलमधून एखाद्या अत्यवस्थ रुग्ण इतर हॉस्पिटलला घेवून जायचे असेल तर रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळत नाही. इतर व्यवसायिकांची तर वाटच लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे या परिसरातील व्यवसायिकांचे व्यवसाय चक्क बंद पडले आहेत. महानगरपालिका प्रशासन हा खड्डा कधी बुजवेल, फुटलेली जलवाहिणी दुरुस्त कधी करेल, याची प्रतिक्षा व्यावसायिक करीत आहेत.

