– कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंना धक्का, संजय राऊत संतापले
मुंबई : प्रतिनिधी
‘एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा ठाकरे बंधूंनी केली होती; परंतु निवडणुकीत अपयश आल्यानंतर विघटनाला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडून आलेले ४ नगरसेवक बेपत्ता झाल्याने आधीच ठाकरे गटात अस्वस्थता असताना तेथे मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून आणखी एक धक्का दिला आहे. आता मुंबईत मनसे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार की महायुतीत जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनसेच्या या निर्णयावर संताप व्यक्त करताना नेतृत्वाने त्या स्थानिक नेत्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी एकहाती सत्ता मिळवण्यासाठी युतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेने फोडाफोडी सुरू केली असून ठाकरे गटाचे ४ नगरसेवक गळाला लावले आहेत. आता मनसेनेही अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोकण विभागीय आयुक्तालयात गट नोंदणीच्या वेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मनसेचे स्थानिक नेते राजू पाटील हे उपस्थित होते. मनसेने विकासाच्या मुद्यावर आम्हाला पाठिंबा दिल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत युती करूनही मनसेला फारसा फायदा झालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले तर मनसेचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले. २०१७ ला स्वबळावर लढून मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या. या वेळी युती करून मनसेचे संख्याबळ एकने कमी झाले. युती केल्यामुळे पक्षातील अनेक नेते नाराजही झाले होते.
राज ठाकरेंची संमती?
मनसेचे नेते राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याला पक्ष नेतृत्वाची संमती असल्याशिवाय ते असा निर्णय घेण्याची शक्यता नाही. राज ठाकरे यांना पूर्वकल्पना देऊनच ही घोषणा केली असणार, असे मानले जात आहे.
प्रकार चिंताजनक,
कारवाई झाली पाहिजे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज संताप व्यक्त केला. ज्यांनी महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी आणि बेईमानी केली त्यांच्यासह राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाहीत. महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल, अशी भूमिका घ्यायची नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. राज ठाकरेही तसे नेते नाहीत; पण कल्याण-डोंबिवलीचा विषय अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे राऊत म्हणाले.
कल्याणमध्ये ठाकरेंचे
४ नगरसेवक फुटले
कल्याण-डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे ११ पैकी चार नगरसेवक फुटले असून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. उर्वरित सात नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आम्ही सगळे एकत्र आहोत,आम्हाला सत्ता स्थापनेसाठी फोन येतात. मात्र, वरिष्ठांच्या भूमिकेनंतरच निर्णय घेणार, असे या नगरसेवकांनी म्हटले आहे. आता या नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते.

