बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले.
आपल्या दादांची दु:खद बातमी समजली. अजितदादा यांचे निधन झाले, ही गोष्ट मनाला पटतच नाही. अनेकांशी संपर्क केला, त्यांनी ही बातमी खरी असल्याचे सांगितले. तरीही ही बातमी खरी आहे, यावर विश्वासच बसत नाही. राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही खूप मोठी हानी आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता होणे नाही. हे नुकसान भरून निघू शकत नाही. संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अजित पवार स्पष्टपणे काम करणारे नेते होते. कोणाचे काम होणार असेल, तर होकार देणार. काम नसेल होणार, तर सरळ नाही सांगणार. सगळ्या लोकांचे यामध्ये नुकसान झाले आहे. सगळ्या सामाजिक प्रश्नांची जाण असणारे अजित पवार होते. सर्व जाती-धर्माच्या लोकांचे काम अजित पवार करायचे. राजकीय, सामाजिक खूप मोठी हानी झाली आहे.

