जयपूर : वृत्तसंस्था
जयपूर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला. गेल्या वर्षीची विजेती रिया सिंघा हिच्या हस्ते मणिकाला हा मुकुट प्रदान करण्यात आला. या विजयासह, नोव्हेंबर महिन्यात थायलंडमध्ये होणा-या ७४ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत मनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कोण आहे मणिका विश्वकर्मा : मूळची राजस्थानच्या श्री गंगानगरची असलेली मनिका सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मनिकाने गेल्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स राजस्थान’चा किताब जिंकला होता. मनिका केवळ एक सौंदर्यवती नसून एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. ती ‘न्यूरोनोव्हा’ या संस्थेची संस्थापक आहे. या माध्यमातून ती न्यूरोडायव्हर्जन्स, म्हणजेच एडीएचडी सारख्या मानसिक स्थितींबद्दल समाजात असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी काम करते.
मनिका एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. यापूर्वी तिने परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत ‘बिमस्टेक सेवोकोन’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एक उत्कृष्ट वक्ता आणि कलाकार म्हणूनही तिची ओळख आहे. ललित कला अकादमी आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या नामांकित संस्थांनी तिचा सन्मान केला आहे. ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२५’ स्पर्धेसाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला परीक्षक म्हणून उपस्थित होती. मनिका विश्वकर्माच्या विजयाने तिने आनंद व्यक्त केला.

