जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चर्चेची संधी दिली आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ‘सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू’असे विधान केले होते. या विधानाचा संदर्भ देत जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना अंतरवाली सराटी येथे चर्चेसाठी येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सरकारविरोधात नाही. जर सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करणार असेल, तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. प्रसाद लाड यांनी २३ तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना मंजुरी मिळवून द्यावी आणि मंजुरीचे पत्र घेऊन थेट अंतरवाली सराटी येथे यावे.
प्रसाद लाड यांच्या सकारात्मक विधानानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजातर्फे मऊ भूमिका घेतली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी गावागावांत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या बैठका त्यांनी २३ तारखेपर्यंत स्थगित केल्या आहेत. मात्र, ३० मे रोजी सुरू होणा-या त्यांच्या ‘आमरण उपोषणाची’ घोषणा अद्याप कायम आहे. सरकार २३ तारखेपर्यंत काय निर्णय घेते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
जरांगे यांनी इशाराही दिला
चर्चेचे निमंत्रण देतानाच मनोज जरांगे यांनी सरकारला कडक शब्दांत इशाराही दिला आहे. ‘आम्ही सहसा स्वत:हून कुणालाही चर्चेसाठी बोलावत नाही. तुम्हाला आम्ही सन्मानाने निमंत्रण दिले आहे, त्यामुळे आता आमच्याशी कोणताही दगाफटका करू नका,’ असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
















