Homeमहाराष्ट्रमन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलयं

मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतलयं

अजिदादांच्या अपघाताला दोन महिने पूर्ण; सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये दुर्देवी निधन झाले. आज त्यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्या निमित्त त्यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.

त्या म्हणाल्या, ‘आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.

पुढे लिहिताना, ‘तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.’, असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोकळी भरून निघणार नाही
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणा-या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते, असा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

…तुम्ही दिलेली मूल्ये हीच प्रेरणा
तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.
दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR