आघाडीत बिघाडी!, महायुतीच्या बंडखोराची माघार
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५४ पैकी १३ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. भाजपचे एम. के. देशमुख यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे गणित सोपे झाले. मात्र, महाविकास आघाडीतील तिढा कायम राहिल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकूण ५४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ४१ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपचे एम. के. देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीकडून सतीश चव्हाण हेच प्रमुख उमेदवार असतील.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद मात्र दूर होऊ शकले नाहीत. या मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्याचे सांगत दिलीप घुगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अखेरच्या क्षणी दोघांनीही माघार न घेतल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. यामुळे आता सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
मराठवाडा पदवीधर
निवडणुकीसाठी मतदार
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एकूण ३ लाख २६ हजार ७०१ पदवीधर मतदार आहेत. यामध्ये २ लाख ४८ हजार ९७१ पुरुष मतदार, ७७ हजार ७१७ महिला मतदार आणि १३ इतर मतदारांचा समावेश आहे.
८४२ मतदान केंद्रे
मतदानासाठी संपूर्ण मराठवाड्यात ८४२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ९३५ केंद्राध्यक्ष आणि २ हजार ८१४ मतदान अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.
२३ ऑक्टोबरला मतदान
२३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील वूडस्ट्रीम डेकार एलएलपी येथे मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
पुण्यात महायुतीत बंड
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीचे कौस्तुक गावडे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार जयंत आसगावकर यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय माजी आमदार दत्तात्रय सावंत तर मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचे आव्हान भाजप महायुतीला आहे. मात्र, मंगेश चिवटे यांनी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, नागपूरमध्येही भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे भाजपसमोरच आव्हान असणार आहे.
















