13.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात महायुतीला तडा?

मराठवाड्यात महायुतीला तडा?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तार, बांगर यांचा स्वबळाचा नारा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती एकत्र लढणार असे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र स्थानिक पातळीवर त्या त्या मतदारसंघातील आमदारांची आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची वेगळीच भूमिका असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तीनही नेत्यांनी महायुतीचा राग आळवला असला तरी आमदारांचा मूड मात्र वेगळाच दिसतो.

इकडे मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी महायुती नको, स्वबळावर शिवसेनेचा भगवाच फडकवणार, असे म्हणत दंड थोपटले आहेत. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्रितच लढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या निवडणुका आम्ही युतीत लढणार आहोत असे शिंदे ठामपणे म्हणाले होते. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचे काही आमदार स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत, तशीच भाजपकडूनही केली जात आहे.
मराठवाड्याचा विचार केला तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु अब्दुल सत्तार यांनी तर मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेत स्वबळाची घोषणाच करून टाकली.

माझ्या मतदारसंघातील नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा संस्थांमध्ये केवळ शिवसेना आणि शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील असा दावा सत्तार यांनी केला आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार अवघ्या १४२० मतांनी विजयी झाले. महायुती असली तरी भाजपशी त्यांचे संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत.

तिकडे, जळगावच्या पाचोरा, भडगाव मतदारसंघातून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी जाहीरपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानंतर भाजप आमदारानेही त्याला उत्तर म्हणून स्वबळाचा नारा दिला आहे.

हिंगोलीत बांगरचाही स्वबळाचा नारा
हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून युती आघाडी केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम करू आणि त्यांना निवडून आणू, असे स्पष्ट करत बांगर यांनीही स्वबळासाठी दंड थोपटले आहेत.

उदय सामंतांनी टोचले कान
तळकोकणात महायुतीतच स्वबळाच्या घोषणा दिल्या जात आहेत. यावरून शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी मित्र पक्षातील काही पदाधिका-यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी, कोणाला खुमखुमी असेल तर त्यांनी एकदाचे जाहीर करावे. मग धनुष्यबाण कसा चालतो ते देखील आम्ही दाखवून देऊ, असे म्हणत आक्रमक शैलीत उत्तर दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR