दिवाळीनंतर मिळणार मदत, शेतक-यांच्या नशिबी प्रतीक्षाच
मुंबई : प्रतिनिधी
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने ३४६.३१ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे सुमारे ३ लाख ५८ हजार शेतक-यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, दिवाळीनंतरच शेतक-यांच्या खात्यात हे पैसे येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. परंतु ही मदत टप्प्याटप्प्याने मंजूर केली जात असल्याने शेतक-यांना मदत मिळण्यास विलंब होत आहे.
यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यासाठी सरकारने हा मदत अध्यादेश जारी केला. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला. सरकारकडून मदत जाहीर झाली असली तरी प्रत्यक्ष पैसे शेतक-यांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात तर अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्यात बुडाली तर नदीकाठावरील पिके वाहून गेली. तसेच शेतीही खरडून गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले. एक तर शेतीची मशागत, पेरणी, कोळपणीचा खर्च आणि त्यात खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतीचे अभूतपूर्व नुकसान झाल्याने शेतक-यांना मोठी मदत मिळावी, अशी मागणी होत होती. अखेर राज्य सरकारने ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर लगेचच शेतक-यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही शेतक-यांना दिवाळीआधी मदत दिली. परंतु बहुतांशी शेतक-यांच्या नशिबी अद्याप प्रतीक्षाच आहे. राज्य सरकार टप्प्याटप्प्याने मदतीची रक्कम मंजूर करीत आहे. त्यामुळे आता ब-याच शेतक-यांना दिवाळीनंतरच मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतक-यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण शेतक-यांना दिवाळीत मदत मिळणे अपेक्षित होते. परंतु ही मदत मिळाली नाही. परंतु टप्प्याटप्प्याने निधी मंजूर केला जात असल्याने लवकरच शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते.
राष्ट्रवादी शरद पवार
गटाचे आंदोलन
शेतक-यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि भाजप महायुती सरकारमध्ये संघर्ष पेटला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सरकारने शेतक-यांची दिवाळी काळी केली आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीने (शरद पवार गट) केला आहे.
जरांगे पाटील यांचे आता
शेतक-यांसाठी आंदोलन
राज्य सरकार मदतीची घोषणा करीत आहे. निधीही मंजूर करीत आहे. परंतु दिवाळीत ब-याच शेतक-यांच्या खात्यात नुकसान भरपाई मिळालेली नाही. संकटग्रस्त शेतक-यांना हातभार लावणे सरकारची जबाबदारी आहे. पण शेतक-यांना मदत मिळत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर अंतरवालीत शेतकरी तज्ज्ञांशी चर्चा करून शेतक-यांसाठी आंदोलनाची तारीख निश्चित करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
शेतक-यांच्या मदतीबाबत
राज्य सरकार अपयशी
शेतकरी उद्ध्वस्त होत असताना त्याला मदत करण्याची भूमिका जाहीर केली जाते. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही मोठी मदत दिल्याने सांगितले जाते. डबल इंजिनचे सरकार असताना शेतक-यांना मदत देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.















