नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील मुस्लीम महिला मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी सरसावल्या आहेत. चुलीवर भाकरी थापटून तब्बल २५०० भाक-या मुंबईच्या दिशेने मुस्लीम महिलांनी पाठवल्या आहेत.
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव मतदारसंघातून भाकरी पुरविल्या जात आहे. या व्यवस्थेत मुस्लीम समाजाचाही मोठा पुढाकार दिसून येत आहे. मुस्लीम समाजाच्या महिलांनी मराठा आंदोलनकर्त्यांसाठी तब्बल २५०० भाक-या तयार करून खारीचा वाटा उचलला आहे.
भाकरी, चपाती मुंबईच्या दिशेने रवाना
तर ‘एक भाकर समाजासाठी’ हे ब्रीद घेऊन नाशिकच्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी, चपाती, चटणी, ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. एक भाकर समाजासाठी यात ओबीसी, मुस्लीम समाजाकडूनही भाकरी, चपाती देण्यात आल्या आहेत.
















