मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. मात्र अनेक अमराठी रिक्षा-टॅक्सीचालक हा नियम धुडकावून लावत आहेत. मराठी न येण्यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद उद्भवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आले आहे.
नवीन नियमाप्रमाणे जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसेल तर त्याला आधीच एका महिन्याची नोटीस देण्यात येईल. त्या एका महिन्यात देखील चालकाने मराठी शिकली नाही, तर त्याचे लायसन्स ३ महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे.
यानंतर देखील चालक मराठी शिकत नसेल तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरदूत या कायद्यामध्ये असणार आहे. आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे.
त्यातूनच सरकारने या कायद्यात सुधारणा करून काही कठोर तरतुदी केल्या आहेत. शासकीय अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात आले आहेत.
या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या अॅप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.
















