मुंबई : प्रतिनिधी
ग. दि. माडगूळकर, जगदिश खेबुडकर आणि मंगेश पाडगांवकर या शब्दप्रभूंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे स्व. ग. दि. माडगूळकर, स्व. जगदिश खेबुडकर आणि स्व. मंगेश पाडगांवकर यांच्या गाजलेल्या चित्रपटगीतांचा व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला.
या दिवाळी पहाट कार्यक्रमास सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त जितेंद्र राऊत, स्व. मंगेश पाडगांवकर यांच्या कन्या अंजली पाडगांवकर हजर होत्या. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
















