मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला इशारा दिला. ‘उपोषण सोडणार नाही, मुंबईत जाणारच’, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सरकारला सांगितले. मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधत त्यांना आजपासूनच मुंबईकडे निघा आणि पाहुण्यांकडे जाऊन राहा, असे आवाहन केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपण मुंबईमध्ये जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी यावेळी सर्व मराठा बांधवांना मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा असे आदेश दिले.
मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आज मुंबईला जाण्याचा संपूर्ण प्लॅन सांगितला. ते म्हणाले की, सरकारकडून कुणीही संपर्क साधलेला नाही. मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईत जाणारच. जमेल तसे मराठ्यांनी मुंबईकडे निघावे. मित्रांकडे- पाहुण्यांकडे जाऊन राहावे. १२ तारखेपर्यंत मुंबईला जा आणि घाबरू नका. १२ तारखेच्या २-४ दिवस आधी हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जा. मराठे मुंबईत आले हे समजले नाही पाहिजे. सगळे माझ्यासोबत येऊ नका त्यामुळे आधीच त्यांनी पुढे जावे .
मनोज जरांगेंनी मराठ्यांना आवाहन केले की, वाशी, पनवेल, कल्याण-भिवंडीला आपले खूप लोक आहेत. २ ते ३ दिवसांत मुंबईतील आपल्या लोकांना शोधा आणि त्यांच्याकडे जाऊन राहा. १२ तारखेला आम्हाला अडवले तर मुंबईत गेलेले मराठे तरी तयार राहतील. फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. पोलिसांना आपल्याला त्रास द्यायचा नाही. टाईमपास करू नका. आपल्या गाड्यांना झेंडा लावून मुंबईकडे निघा. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घ्यायची नाही. या वेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेतले हे संविधानिक आहे का?
















