बंगळुरू : वृत्तसंस्था
चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीमुळे गेल्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपच्या विजयानंतर ‘मरिन ड्राईव्ह’वर उद्भवलेल्या अनावस्था प्रसंगाची आठवण जागी झाली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे गेल्यावर्षी ४ जुलै २०२४ रोजी टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिरवणूक निघाली असताना स्टार क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक एकमेकांवर पडून चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी सुदैवाने कोणाचा मृत्यू झाला नव्हता.
आरसीबी संघाच्या विजयी खेळाडूंची मिरवणूक काढली केला जात असताना बंगळुरु येथे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या मिरवणूकीला मोठी गर्दी उसळली होती. मात्र विजयोत्सव साजरा करताना गर्दी किती होईल याचे भान न राहिल्याने ही दु:खद घटना घडली आहे. असे काही घडेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ खेळाडू वाहनातून आत शिरत असताना त्यांची एक झलक पाहणा-यांनी इतकी गर्दी केली ती पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेली. त्याचे परिवर्तन गर्दीच्या लाटेत होऊन चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १० जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत २० जण जखमीही झाले आहेत.
दरम्यान, हैदराबाद येथे पुप्षा-२ चित्रपटाच्या प्रिमीयरला अभिनेता अल्लू अर्जून याला पाहाण्यासाठी जमलेल्या जमावात चेंगराचेंगरी होऊन एका ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू तर तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करुन आंध्र सरकारने अटक केली होती. कोमात गेलेल्या या लहान मुलाला अभिनेता अल्लू अर्जून मदतही केली होती.
याशिवाय, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळात पवित्र स्रानाचा मुहूर्त गाठण्यासाठी पहाटे गंगा तीराकडे धावत निघालेल्या जमावाने झोपलेल्या श्रद्धाळूंना चिरडले होते. तसेच रेल्वे स्थानकातही महाकुंभसाठी गाडी पकडताना चेंगराचेंगरी होऊन प्रवाशांचा मृत्यू झाला होता.