26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रमविआ म्हणून मनपा लढवणार

मविआ म्हणून मनपा लढवणार

शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगतापांनी जाहीर केली भूमिका राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून आगामी महानगरपालिका निवडणुका लढवणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पवारांच्या भेटीनंतर बोलताना प्रशांत जगताप यांनी पक्षाची भूमिका ‘महाविकास आघाडी’ म्हणून निवडणूक लढवण्याची असल्याचा पुनरुच्चार केला. सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडूनही त्यासाठी आम्हाला आदेश येत आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले.

प्रशांत जगताप म्हणाले की, आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी वेळ दिला होता, त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील, आपण महाविकास आघाडीसोबत लढलो तर काय होईल, इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल, याचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला आहे. यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे की पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढू.

पुणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात जगताप यांनी शरद पवार यांच्यासमोर एक लेखाजोखा मांडला. आगामी मनपा निवडणूक मविआ म्हणून झाल्यास कशी होईल किंवा चुकीची आघाडी झाल्यास त्याचे काय निष्कर्ष निघू शकतील, यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशांत जगताप म्हणाले की, आमच्या पक्षात काही जणांची वेगळी मते असू शकतात. पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे अशी भूमिका काही जणांनी मांडली होती. त्यावर असे झाले तर मी पक्षाच्या पदाचा राजीनामा देईल, असे मी म्हटले होते, अशी जगताप यांनी आठवण करून दिली. या भूमिकेनंतर त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी पक्षाची भूमिका मविआ म्हणून निवडणूक लढवण्याचीच राहील, हे पवारांनी स्पष्ट केल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR