15.3 C
Latur
Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रमहसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
महसूल विभागाने मुंबईकरांसाठी दिवाळीची खास सुविधा जाहीर केली आहे. आता मुंबईतील कोणत्याही स्टॅम्प कार्यालयात दस्तऐवज नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारने क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आता आपल्या क्षेत्रावर मर्यादित न राहता मुंबईतील कोणत्याही सहा स्टॅम्प कार्यालयांत दस्तऐवज नोंदणी करू शकतील. ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक आहेत, तेथीलच कार्यालयात नोंदणी करण्याची अट आता लागू नाही. कोणत्याही स्टॅम्प कार्यालयात आता कागदपत्रांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक आता बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान स्टॅम्प कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी १ व २) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

सदर सुधारणा मुंबईकरांचा वेळ व धावपळ वाचवेल, तसेच निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज वेगवान होईल. यासंदर्भात शासनाकडून राजपत्र जारी करण्यात आले आहे.

अर्ज मिळाल्यानंतर ३० दिवसांत मोजणी पूर्ण

जागा मोजणीसाठी अर्ज मिळाल्यानंतर ३० दिवसांत मोजणी पूर्ण केली जाईल. राज्यात खासगी भूमापकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यामध्ये परवानाधारक खासगी भूमापक सहभागी असतील. त्यांच्या माध्यमातून राज्यातील मोजणी प्रक्रिया सुरु होईल. राज्यातील सीटी सर्व्हे ऑफिसर आणि डिपियुटी एसएलआर अधिकारी यांना ती प्रमाणित करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे मोठ्या प्रमाणावर मोजणीसाठी यंत्रणा तैनात केली जाणार आहे. तांत्रिक पात्रतेनुसार मोजणी पूर्ण केली जाईल. राज्यातील साडे तीन कोटी लोकांची मोजणी, भूसंपादन आणि इतर संबंधित कामे यासाठी ही महत्त्वाची पावले आहेत. महसूल विभागाच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. याआधी मोजणीसाठी ९० ते १६० दिवस लागायचे; आता ही प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR