लातूर : प्रतिनिधी
शेतीची मशागत महागली, खतांचे दर गगनाला भिडले, शेतमजुरांकडून होणारी अस आर्थिक अडवणूक यासह अनुषंगिक घटकांचे दर शेतक-यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. दिवसांगणिक वारेमाप भडकलेल्या महागाईच्या वरवंट्याखाली शेतक-यांचे आर्थिक गणित भरडून निघू लागले आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर वाढलेल्या खर्चाने शेतक-यांची चागंलीच अर्थि कोंडी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांचा शेतीचा खर्च सातत्याने वाढतच चालला आहे. मात्र त्याचे उत्पादन कमी निघत आहे. शिवाय त्याचे शेतातील उत्पन्नदेखील घटले आहे. परिणामी ऐन खरिपाच्या तोंडावर शेतक-याला आर्थिक खर्चाची हातमिळवणी करताना अक्षरश: दिवसा चांदण्या दिसू लागल्या आहेत.
तीन वर्षांपूर्वी सन २०२१ च्या मे मध्ये विविध खत कंपन्यांनी खत दरात मोठीच वाढ केली होती. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी देखील ऐन खरिपाच्या तोंडावर झाली आहे. चार वर्षांमागे खताच्या पोत्यामागे २०० ते ६०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यावेळी सरासरी ४५४ रुपयांची दर वाढ झाली होती. मात्र, आतादेखील दर वाढल्याने शेतकरी चांगलाच हबकला आहे. वास्तविक पाहता खतांची दरवाढ साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऐन खरिपाच्या तोंडावरच खतांच्या दरात वाढ होऊ लागली आहे. खतांच्या दरवाढीचा फटका खरीपपूर्व मशागतीत गुंतलेल्या शेतक-यांंना चांगलाच बसू लागला आहे. जाहीर झालेल्या दरवाढीच्या आकडेवारीनुसार दरवाढीत अनेक नामवंत कंपन्या आघाडीवर आहेत. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सर्वाधिक मागणी असलेल्या युरिया खताच्या दरात मात्र वाढ झालेली नाही. युरियाचे दर २६६ रु.इतकाच आहे.
आता शेतीची मशागत ही शेतक-याच्या आवाक्यात राहीली नसून मशागतीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतक-यांच्या आणि शेतीच्या अर्थकारणावर निश्चितपण याचा परिणाम होऊ लागला आहे. सर्वाधिक फटका हा शेतीमशागतीचे दर महाग होण्यावर झाला आहे. नांगरट, खुरटणी, रोटर मारणे, सरी सोडणे, ऊस भरणी यांचे दर वाढल्याने शेतीची मशागतदेखील शेतक-यासाठी महाग होऊलागली आहे. शेतमजुरांकडून तर मोठीच अडवणूक होत असल्याने शेतकरी पेरणी, आंतरमशागती यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर देखील वाढले आहेत. परिणामी सामान्य शेतक-याला शेती पिकवणे आता अवघड होऊ लागले आहे.