मुंबई : प्रतिनिधी
गेल्या ३० वर्षांपासून अधिक वर्षे शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर सोमवारी (ता. २८ जुलै) रात्री गुजरातमधील अनंत अंबानींच्या मालकीच्या ‘वनतारा’कडे पाठवण्यात आली. पण यानंतर नांदणी ग्रामस्थांसोबतच कोल्हापूरवासीयांचा आक्रोश वाढत चालला आहे. महादेवीला परत आणण्यासाठी ३ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात पदयात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने कोल्हापूरकर रस्त्यावर उतरल्यानंतर मंगळवारी (५ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी महादेवी हत्तिणीसंदर्भात मुंबईतील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. हत्तीण वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आहे. पण तरी जनभावनेचा आदर करत आता आपण हत्तीण परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हत्तीण परत आणण्यासाठी पुढाकार घेणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, ३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकारसुद्धा एक याचिका दाखल करेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, महादेवी हत्तिणीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल आणि तसेच सुप्रीम कोर्टात ही भूमिका मांडेल. महादेवीसाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे. महादेवी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकारही बाजू मांडणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितले असल्याचे समोर आले आहे.

