लातूर : प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक ९ हा मनपा कार्यालया शेजारी येतो परंतु मनपा शेजारी असून ही या प्रभागामध्ये समस्याच समस्या आहेत. या प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. सर्वत्र घाण, नाल्या तुंबलेल्या, डासांची फलटण यामुळे रोगराई पसरली असून महानगरपालिका प्रशासनावर या प्रभागातील नागरिकांनी ‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात रोष व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये महानगरपालिकेला लागून असेला उस्मानपुरा, सावेवाडी, त्रिमुत्री नगर, खोरे गल्ली, मित्र नगर श्रमसाफल्य सोसायटी, ज्ञानेश्वर नगर, केशव नगर, जाफर नगर परिसराचा समावेश आहे. इस्मालपुरा परिसरातील अफसरबी पठाण सांगतात आमच्या परिसरातील नाली तुंबली असून यामुळे महात्मा बस्वेश्वर कॉलेजकउे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून बंद पडला आहे. नाल्या नसल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणि आमच्या घरात घुसते नाली नसल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत असल्याने दुर्गंधी सहन होत नाही. डासांचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. डासांमुळे रोगराई पसरुन मुलं आजारी पडतात. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च झेपत नाही. महानगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगुनही मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. शेख मुसताक यांनी ही मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त आम्हाला रस्ता नाही. होता तो अनेक वर्षापासून बंद आहे. प्रत्येक पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात शिरते नालीचे घाण पाणी घरासमोरून वाहते यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात रोगराईचा समाना करावा लागतो.आम्हाला मनपा कार्यालय शेजारी असून याचा काहीच उपयोग नाही, असा संताप व्यक्त केला.
तर या प्रभागातील सावेवाडी येथील भिमाशंकर लगाडे यांनी बोलताना नियमितपणे नालींची सफाई केली जात नाही यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रोगराईला आम्हाला सामोरे जावे लागत आहे असे असताना मनपाचे अधिकारी लोकप्रतिनिधी आमच्या परिसरात फिरकतही नाहीत असे सांगितले तर दिल्ली दरबार हॉटेल मागील खोरी गल्लीतील इम्रान खुरेशी यांनी या परिसरात मी लहान असतासना जवळपास ४० वर्षापुवी नालींचे बांधकाम करण्यात आले होते आता फक्त नाल्यांचे अवशेष दिसून येतात. नाल्यांची पडझड होऊन नाल्या तुंबल्याने परिसरात मोठी दुगंधी पसरली असून पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात घुसते. चुकन कधी नाल्यांची साफसफाई केली गेली तर नालीतून उपसण्यात आलेली घाण अनेक दिवस ती रस्त्यावरच पडून असते असे सांगितले.
तसेच मित्र नगर येथील नारायण जाधव यांनी आमच्या परिसरात चार ते पाच वर्षापासून तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करणयात आलेली नाही व नाल्यावरच कच-याचे ढिग पडले आहेत. यामुळे रोगराई पसरत असून मनपाकडे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई व पडलेले कच-याचे ढिग उचलण्याची मागणी करून ही मनपा प्रशासनाकडून याला गांभिर्याने घेतले जात नाही असे सांगितले. श्रमसाफल्य सोसायटी, ज्ञानेश्वर नगर, केशव नगर, जाफर नगर परिसरामध्ये ही याच समस्येने नागरिक ग्रस्त असल्याचे दिसून येते.

